सांगली : सांगली, मिरजेत बांधकामे हळूहळू सुरू झाली आहेत. जिल्हाबाह्य वाहतूक अद्याप पुरेशा गतीने सुरू नसल्याने व्यावसायिकांना बांधकाम साहित्याची चणचण भासत आहे. स्थलांतरित मजुरांनी गावाकडचा रस्ता धरल्यानेही मजुरांचीही टंचाई निर्माण झाली आहे.सुमारे दीड महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र प्रमाण अत्यल्प आहे. नवी कामे कोठेही सुरू नाहीत. जुन्याच कामांचा उरक सुरू आहे. फरशी, प्लंबिंग, विद्युतीकरण आदी अंतर्गत कामे सुरू आहेत.
खडी, वाळू आदीच्या वाहतुकीसाठी आरटीओनी परवाने दिले आहेत. व्यावसायिकांनी पावसाळापूर्व कामे संपविण्याला प्राधान्य दिले आहे. बाहेरून गिलावा, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते अशी कामे उरकली जात आहेत.अवजड कामे मात्र सुरू झालेली नाहीत. स्लॅब किंवा नवी बांधकामे तूर्त बाजूलाच ठेवली आहेत. जिल्ह्याबाहेर वाहतुकीला निर्बंध आणि कामगारांची टंचाई, ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे ह्यक्रेडाईह्णचे अध्यक्ष रवींद्र खिलारे यांनी सांगितले.
कृत्रिम वाळूसाठी जिल्ह्यातील व्यावसायिक जयसिंगपूरला जातात; पण वाहतुकीला मनाई असल्याने वाळूची कामे थांबली आहेत. टाईल्स, अंतर्गत सजावटीचे साहित्य आदीची पुण्याहून आवक होते. तीदेखील थांबली आहे.
परराज्यातील स्थलांतरित मजुरांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. बरेच मजूर परतलेही आहेत. त्यामुळेही कामांना ब्रेक लागला आहे. सदनिकांचे आरक्षण झालेल्या अपार्टमेंटची कामेही प्राधान्याने सुरू झाली असल्याचे ठेकेदारांनी सांगितले.