सांगली : जत पूर्व भागात ऊस तोडणीला गेलेले मजूर, परराज्यातील मजूर, मेंढपाळ, तसेच बाहेरगावातील लोक गावी परतू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. गावात आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. संख प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १३८८ ऊसतोडणी मजूर व इतर ४४४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.जत पूर्व भागातील मजूर ऊस तोडणीसाठी दरवर्षी सहा महिने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात स्थलांतर करतात. लॉकडाऊनमुळे मजूर कारखान्यावर अडकून पडले होते. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना गावी परतण्याची मुभा दिली आहे.साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे. हंगाम संपल्यानंतर ऊस तोडणी मजूर गावी परतू लागले आहेत. मजुरांची वैद्यकीय तपासणी करून हातावर ह्यहोम क्वारंटाईनह्णचे शिक्के मारुन घरी सोडण्यात येत आहे.गोवा, कर्नाटक भागात गेलेले मजूरही परतू लागले आहेत.
गोवा येथे दगड खाणीमध्ये येथील मजूर मोठ्या संख्येने काम करतात. सांगली, कोल्हापूर भागात नदीकाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. परंतु लॉकडाऊनमुळे मजूर त्या-त्या भागात अडकून पडले होते. काम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शासनाने त्यांनाही गावी परतण्याची मुभा दिली आहे. या मजुरांची कामाच्या ठिकाणी तसेच गावी परतल्यानंतरवही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.दरीबडची, संख परिसरातील ऊसतोडणी मजूर कऱ्हाड, सातारा, इस्लामपूर या भागात होते. हायरिस्क भागातून मजूर हे आल्याने ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. मजुरांना गावाबाहेर शाळेत, घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मजूर व ग्रामस्थांमध्ये वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत.याशिवाय चाऱ्यासाठी कर्नाटकातील डोण भागात गेलेले मेंढपाळही एप्रिल महिन्यात गावी परत येतात. लॉकडाऊनमुळे तेही अडकून पडले होते. सध्या अवकाळी पाऊस होऊ लागल्याने ते गावी येऊ लागले आहेत.