सुशांत घोरपडेम्हैसाळ (जि. सांगली) : शासनाचा ई पास असूनसुध्दा सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून दीड महिन्याच्या लहान लेकराला घेऊन बाळंतीण महिला म्हैसाळ येथील कर्नाटक सीमेरेषवर आपल्या गावी जाण्यासाठी तब्बल 21 तासापासून प्रतिक्षा करत आहे.कर्नाटक राज्यातील अनेक मजूर आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागात मजुरी करतात. लॉकडाऊन सुरू असताना शासनाच्या नियमानुसार मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी ई पास देण्याची सोय आहे. त्यानुसार अनेक मजूर नियमानुसार ई पास घेऊन प्रवास करत आहेत. पण ई पास असूनही कर्नाटक पोलीस या मजूरांना कर्नाटकात प्रवेश देत नाहीत.
उलट ते या मजुरांना निपाणीमार्गे कर्नाटकात जा, असा सल्ला देत आहेत. म्हैसाळच्या कर्नाटक सीमारेषेपासून निपाणी 110 किलोमीटरवर आहे. पण त्यामार्गे जाण्यासाठी या मजुरांकडे पैसै नाहीत. कालपासून सर्वजण उपाशी आहेत. लहान बाळांना दूध नाही. काल पूर्ण रात्र मजुरांनी ट्रँक्टरमध्ये काढली.
लहान दीड महिन्याच्या लेकराला घेऊन बाळंत महिलेने पूर्ण रात्र टाटा सुमो या गाडीत काढली. काही जणांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र व परवाना आहे. त्यांची सुध्दा अडवणूक केली आहे. लष्करातील एक जवान त्याच्या कुटुंबासोबत कालपासून रस्त्यावर उभा आहे. आम्हाला सोडायचे नव्हते तर आम्हाला सरकारने परवानगीच का दिली, असे प्रश्न हे मजूर विचारत होते.