सांगली : शहरातील जनता कोरोनाशी लढा देत असताना, महापालिकेत मात्र आयुक्त व महापौरांत संघर्ष पेटला आहे. दोन्ही जबाबदार व्यक्तींनी एकमेकांना आव्हान देत उणीदुणी काढली. संघर्षाची हीच का ती वेळ, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याचा दोघांनीही गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा दोघांतील सुंदोपसुंदीत कोरोनाविरुद्धची लढाई बाजूला पडून त्याची किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागेल.महापौर गीता सुतार व आयुक्त नितीन कापडणीस यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. सुतार यांची महापौरपदी निवड होऊन तीन महिने झाले आहेत. त्यातही मार्चपासून कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याची तयारी आयुक्तांनी चालविली होती, मग या तीन महिन्यांत असे काय घडले की, कोरोनाचे संकट गडद होत असताना त्यांच्यात उद्रेक झाला. याचे कोडे साऱ्यांनाच पडले आहे.
आमराईतील प्रस्तावित कामे ही केवळ निमित्तमात्र आहेत. ही कामे तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. कामाची वर्कआॅर्डर, निधीबाबत निश्चित वाद आहेत. विनानिविदा, बेकायदेशीर कामे हा महापालिकेच्या कारभारात कळीचा मुद्दा राहिला आहे; पण त्यावर चर्चा करण्याचीही वेळ नाही.
कोरोनाची तयारी सुरू झाल्यापासूनच पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता होती. गेल्या तीन महिन्यांत महापौर-आयुक्तांमधील विसंवाद हेच संघर्षाचे प्रमुख कारण असावे. कोरोना खर्चाच्या विषयावर महासभेत खुद्द आयुक्तांनी खुलासा केला होता. त्यात आयुक्तांनी ५० लाखांची कामे करण्याचा दबाव महापौरांनी आणल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
महापौरांच्या अधिकाराबाबत आयुक्तांनीही जाहीर वक्तव्य करणे चुकीचे आहे. कोरोनाच्या संकटात महापालिकेतील हा संघर्ष नागरिकांच्यादृष्टीने न परवडणारा आहे.