सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडील आशा वर्कर्स जीव धोक्यात घालून सर्व्हेक्षणाचे काम करीत आहे. या आशा वर्कर्ससाठी नगरसेवक विष्णू माने यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे. हे मानधन सर्व आशा वर्कर्सना समप्रमाणत वाटप करावे, अशी विनंतीही त्यांनी नगरसचिवांना केली आहे.
महापालिका क्षेत्रातील विजयनगर परिसरात कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. रविवारी सायंकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर विजयनगरचा परिसर जिल्हा प्रशासनाने सील करून तातडीने उपाययोजना हाती घेतल्या.
हा परिसर नगरसेवक विष्णू माने यांच्या वार्डात येतो. महापालिकेने या परिसरात औषध फवारणी, स्वच्छता मोहिम हाती घेतली. तसेच आशा वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षणही करण्यात आली.
आशा वर्कर्सनी दोन दिवसांत प्रतिबंधित क्षेत्रातील २५ हजार नागरिकांची तपासणी करून सर्वे पूर्ण केला होता. त्यांच्या कामाची दखल घेत नगरसेवक विष्णू माने यांनी या आशा वर्कर्सना आर्थिक मदत म्हणून एक महिन्याचे मानधन दिले आहे. तसे पत्र त्यांनी महापालिकेच्या नगरसचिवांना दिले असून एप्रिल महिन्याचे मानधन या आशा वर्कर्संना समप्रमाणात वाटप करावे, अशी विनंतीही केली आहे.