सांगली : शहर व परिसरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे सांगलीतील व्यवहार आणि वर्दळ कायम आहे. यशस्वी वैद्यकीय उपचार, प्रशासनाच्या उपाययोजना यामुळे लोकांमधील विश्वास वाढत असून, सांगलीकरही तितकीच सतर्कता बाळगत असल्याचे दिसत आहे.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढत आहेत. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात पाच रुग्ण आहेत. एकूण सहाजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील विजयनगरच्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
गेल्या सात दिवसात चार रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मात्र सांगली पूर्वपदावर आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद असली तरी, मार्केट यार्ड, विस्तारित भाग-उपनगरांतील सर्व दुकाने, अत्यावश्यक सेवा-सुविधा तसेच खासगी, शासकीय आस्थापना सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्रही गतिमान झाले आहे.
मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे याचे पालन करीत व्यवहार सुरू आहेत. कोरोनाबाबतची भीती प्रशासकीय उपाययोजनांमुळे काहीशी दूर होत आहे. प्रशासकीय उपाययोजनांना लोक प्रतिसादही देत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी, परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यभरात सांगलीतील उपाययोजना आणि वैद्यकीय उपचारांचे कौतुक होत आहे.