सांगली : लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या फुरसतीमध्ये घरोघरी खवय्येगिरी उफाळून येत आहे. हॉटेल्स आणि बेकऱ्या बंद असल्याच्या काळात घरातच वेगवेगळे मेनू तयार होत आहेत. यू-ट्यूबवरून रेसिपींचे अनुकरण करत दररोज काहीतरी हटके आयटम किचनमध्ये तयार होत आहेत.एरवी सुटीच्यादिवशी हॉटेलिंग करणे किंवा बाहेरून पदार्थ मागवणे, हा ठरलेला शिरस्ता आहे; पण सध्या लॉकडाऊनमुळे मिळालेली सुटी भलतीच दीर्घ ठरली आहे. या काळात हॉटेल्सही बंद आहेत आणि बेकऱ्यादेखील. घरबसल्या दुसरा उद्योगही नाही. मग हाताला येतो मोबाईल आणि यू-ट्यूब. अनेक शाकाहारी आणि मांसाहारी रेसिपी यू-ट्यूबवरून साकारल्या जात आहेत. त्यासाठी बेकरीमधून साहित्य उपलब्ध केले जात आहे.
विशेषत: पिझ्झा बेस, पावभाजीचा पाव, वड्यासाठीचे छोटे पाव, मिसळसाठी पावाच्या लाद्या यांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. बेकऱ्यांनी रेडी टू इट बंद केले आहेत. फक्त पार्सल सुरू आहे. त्यामुळे बेकरीतून साहित्य नेऊन घरातच पदार्थ बनविण्याकडे कल आहे. सँडविच ब्रेड, मिल्क ब्रेड, बटर खारी, टोस्ट, ड्राय केक हे नेण्यासाठी बेकरीमध्ये गर्दी होत आहे. अंडी, रोल्स, विविध फ्लेवर्स यांनाही मागणी आहे. पाणीपुरी, भेळ, मिसळ, डोसा, उत्ताप्पा हे एरवी सांगलीच्या चौपाट्यांवर मिळणारे पदार्थ, पण आता घरोघरी किचनमध्येच त्यांचे बेत केले जात आहेत. त्यासाठीही बेकरीमधून साहित्याला मागणी आहे.
चिकन-मटण दुकाने बंद असल्याने मांसाहारी मेनूला फाटा मिळालाय, पण अंड्याच्या रेसिपी जोरात आहेत. कोरोनामुळे अंडी स्वस्त झाल्याचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. बुर्जी, आॅम्लेट, सॅण्डविच असे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या रेसिपी किचनमध्ये साकारत आहेत.केक मिळणार नाहीवाढदिवसाचे केक तयार करणे बेकरी चालकांनी बंद केले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी गर्दी होते आणि त्यातून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होते. हे लक्षात घेऊन केक तयार करणे बंद केल्याची माहिती बेकरीचालक संघटनेचे खजिनदार नावेद मुजावर यांनी दिली.