इस्लामपूर : मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजल्याने त्याच्या भीतीने इथं मरण्यापेक्षा गड्या आपुला गाव बरा म्हणत तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या सायन आणि घनसोली येथील १२ जण कागल तालुक्यातील आपल्या बेळवले मासा या गावी पोहोचले. मात्र कोरोनाने त्यांचा पिच्छा सोडला नाही.
हातावर शिक्के नाहीत म्हणून गावकऱ्यांनी त्यांना राहू दिले नाही. त्यानंतर तीन दिवस त्यांचा डेरा कासेगावजवळ होता. त्यांची परवड पाहून इस्लामपूर पोलिसांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि माणुसकीच्या भिंतीने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे.बेळवले मासा येथील हे १२ जण आहेत. त्यामध्ये ५ पुरुष आणि ५ महिला आहेत, तर वर्षभराचा एक बछडा आणि २ वर्षाचा एक मुलगा आहे. कोरोनाच्या भीतीने या सर्वांनी एक खासगी वाहन करून मुंबईपासून गावापर्यंत येताना अनेक अडथळे पार केले.
वाहनधारकाने त्यांना त्यांच्या गावात आणून सोडले आणि तो माघारी फिरला. पण इकडे या सर्वांचे दुर्दैव आड आले. कोरोनाची धास्ती ग्रामीण भागात अधिक आहे. बाहेरून येणाऱ्यांवर कडी नजर आहे. अशीच कडी नजर ठेवून असणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या घराचे दारही उघडू दिले नाही. पोलिसांना कळवून त्यांची परत पाठवणी केली. कोल्हापूर पोलिसांनी सांगलीच्या हद्दीवर सोडले. सांगली पोलिसांनी कऱ्हाड हद्द गाठली; मात्र त्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला.त्यावर इस्लामपूर पोलिसांनी त्यांना आपल्या आश्रयाखाली घेतले आणि पंक्तीला बसवून जेवू खाऊ घातले. महामार्गावर निवारा नसल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी इस्लामपूरमधील सद्गुरू ट्रस्टच्या डॉ. सत्यजित जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना आश्रमशाळेतील खोल्यांमध्ये त्यांच्या निवासाची विनंती केली.जाधव यांनी त्याला तात्काळ होकार देत मदतीचा हात पुढे केला. शनिवारी रात्रीपासून हे सर्व प्रवासी येथे वास्तव्यास आहेत. पिंगळे यांच्या पुढाकाराने शहरातील दानशूर व्यक्तींची मदत घेत उभा राहिलेल्या माणुसकीच्या भिंतीने या सर्वांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे.माणुसकीच्या भिंतीने या सर्वांची चांगली व्यवस्था केली आहे. पण गावाची ओढ लागलेले हे सर्वजण आम्हाला आमच्या गावी पोहोचवा, अशी आर्त विनंती करत आहेत. उपअधीक्षक पिंगळे हे स्वत: कोल्हापूर प्रशासनाशी संपर्क साधून आहेत. जिल्हा प्रवेशाचा परवाना मिळताच त्यांना पाठविले जाईल. मात्र तोपर्यंत ही माणुसकीची भिंत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असणार आहे.