सांगली - हज यात्रेहून आलेल्या इस्लामपुरातील चौघा कोरोनाबाधित भाविकांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. त्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अशा रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.इस्लामपूर शहरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्चरोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितले होते. या कुटुंबात ३५ सदस्य असून, हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. बॅरिकेटस लावून तो बंदिस्त केला.बुधवारी सकाळी आणखी पाच जणांचा अहवाल मिळाला असून, तो पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर सांगलीच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक मंगळवारपासून सक्रिय झाले आहे. मात्र रुग्ण शोधण्याचे आव्हान या पथकापुढे आहे. इस्लामपूर शहरात मात्र घबराटीचे वातावरण आहे.
coronavirus : इस्लामपुरात एकाच कुटुंबातील ९ कोरोनाग्रस्त, सांगलीत घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:17 PM