सांगली : शहरातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बुधवारपासून सुरू केली जाणार असल्याची पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही पोस्ट चुकीची असून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडली जातील, इतर दुकानावरील निर्बंध कायम असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हजारपेक्षा कमी झाल्याने प्रशासनाने सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. यात किराणा, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रीला सकाळी सात ते अकरा या चार तासासाठी मुभा देण्यात आली. सोमवारपासून ही दुकाने सुरू झाली. याचवेळी सोशल मीडियावर फेसबुक पेजचा हवाला देत बुधवारपासून सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी असल्याची पोस्ट व्हायरल झाली.
ही पोस्ट बहुसंख्य व्यापाऱ्यांच्या सोशल मीडियावर गेली. त्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. वास्तविक प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने अकरापर्यंत उघडण्यास परवानगी दिली असताना इतर दुकाने मात्र दोनपर्यंत सुरू झाल्याचे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले होते. यावरूनच पोस्टच चुकीची असल्याचे दिसून येते. दरम्यान प्रशासनानेही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरु होणार नसल्याचे सांगितले आहे.