सांगली: इस्लामपुरातील कोरोनाग्रस्त कुटुंबातील आणखी १२ कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कोरोनाबाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. सांगलीत कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. हे सगळे एकाच कुटुंबातील आहे. त्यांच्या तपासणीचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी मिळाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या पेठवडगावमधील एका महिलेलादेखील कोरोनाची बाधा झाल्याचं काल रात्री स्पष्ट झालं. एकाच कुटुंबातल्या तब्बल २३ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबियातील हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्च रोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितलं होतं. या कुटुंबात ३५ सदस्य असून हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. यानंतर बॅरिकेटस लावून तो बंदिस्तदेखील करण्यात आला.
बुधवारी सकाळी आणखी पाच जणांचा अहवाल मिळाला. तो पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा खळबळ उडाली. गुरुवारी रात्री या कुटुंबातील आणखी दोघांचे अहवाल आले. ते पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. यानंतर आता आणखी १२ जणांचे अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ माजली आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील एका महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे.
इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर मिरजेच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक मंगळवारपासून सक्रिय झाले आहे. रुग्ण शोधण्याचे आव्हान या पथकापुढे आहे. एकाच घरातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याने इस्लामपूर शहरात घबराट पसरली आहे.