विटा : कोरोना संसर्गाच्या महामारीत आता जवळचे रक्तातील नातेवाईकही दुरावल्याचे चित्र आज सर्वत्र पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीही येत नाही. अशा वेळी विटा नगरपरिषदेचे कोरोना योध्दे जीवाची पर्वा न करता कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर घरातील नातेवाईक बनून अंत्यसंस्कार करीत आहेत.
विटा शहरातील कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या सुमारे पावणे दोनशेहून जास्त मृतांवर पालीकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात दररोज शंभर ते दीडशे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत विटा शहरातील पाच, खानापूर पूर्व भागातील दोन अशा एकूण ७ कोवीड रूग्णालयात बेडची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू असतानाच कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवरही विटा येथे अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला जात आहे.सध्या खानापूर तालुक्यात दररोज चार ते पाच जणांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याची माहिती मिळत आहे. या मृत रूग्णांवर विटा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. काही मृत रूग्णांच्या नातेवाईकांना कळवूनही ते अंत्यसंस्कार विधीकडे फिरकत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अंत्यसंस्कार विधीसाठी विटा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना मृत रूग्णांचे नातेवाईक होऊन अंत्यविधी उरकून घ्यावा लागत आहे.
विटा नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गेल्या वर्षीपासून सुमारे पावणेदोनशे कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर पालीकेच्या कोरोना योध्दा टीमने अंत्यसंस्कार करून नातेवाईकांचे कर्तव्य बजावले. मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी वैकुंठधाम स्मशानभूमीत जाऊन जीवाची पर्वा न करता स्वत:च्या कुटुंबापासून दूर रहात कोरोनाने मृत झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या टीमची विचारपूस करीत त्यांचे कौतुक केले.मोफत अंत्यसंस्कार...सध्या कोरोनाने थैमान घातले असून मृत्यूचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत मृत रूग्णांचे नातेवाईक स्मशानभूमीत येत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी विटा नगरपरिषदेने कोवीड योध्दांच्या प्रत्येकी पाच जणांच्या दोन टीम तयार केल्या आहेत.
कोरोनाने मृत्यू झालेल्या विटा शहरासह परिसरातील रूग्णांच्या मृतदेहावर कऱ्हाड रस्त्यावरील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यासाठी पालीकेच्यावतीने कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी सांगितले.