सांगली : लक्षणे नसलेल्या व उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बेड अडविले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयात उपचाराची व्यवस्था उभी करणार आहोत, तसेच बेडचा आग्रह कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.समस्त जैन समाजाच्यावतीने उभारण्यात आलेल्या भगवान महावीर कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, डिॉक्टरांनी पुढाकार घेऊन रुग्णालये उभी करावीत, या आवाहनाला सांगलीतील डॉ. रवींद्र वाळवेकर यांनी प्रतिसाद दिला. जैन समाजाने पुढाकार घेत कोरोना रुग्णांसाठी ही व्यवस्था उभी केली. दोन ते तीन दिवसात तालुका पातळीवरही ५०० बेडची व्यवस्था करणार आहोत.संयोजक सुरेश पाटील म्हणाले की, शासनाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी जैन समाजाने रुग्णालय सुरू केले आहे. दानशूर लोकांच्या मदतीने या रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार होतील.
coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:04 AM