अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहेच. मास्क फॅशन म्हणून गळ्यात अडकवला जातो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जात असल्याने रस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे.इस्लामपूर शहरात प्रशासनाने लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले आहेत. सध्या चौका-चौकातील वाहतूक ठप्प होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला नागरिकांनी हरताळ फासला आहे. हीच अवस्था बाजार समिती आवारात आहे. सकाळच्या सत्रात बाहेरून येणाºया भाजीपाल्याचा लिलाव होतो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जातो.
बहुतांशी व्यापारी आणि ग्राहक तोंडाला मास्क न लावताच लिलावात भाग घेत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. या परिसरात गुटखा खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. थुंकल्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सॅनिटायझरची सोय नाही. बाजार समितीचे कर्मचारी केवळ शेतकऱ्यांकडून कर वसुली करताना दिसतात.