सांगली : लॉकडाऊन कालावधी वाढविल्यामुळे तसेच जिल्हाबंदी कायम ठेवल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 3, 5 व 17 जून 2020 रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्य शासनाकडून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.
लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्यात जिल्हाबंदी लागू असल्याने जिल्ह्यातील उद्योग, कृषी व शिक्षण घटकातील व्यक्तींना लगतच्या जिल्ह्यातून ये-जा करण्यासाठी पास देण्याकामी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 3, 5 व 17 जून 2020 आदेशान्वये अनुक्रमे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा कृषि अधिकारी सांगली व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकारी यांनी संबंधितांना पास वितरीत करण्यापूर्वी संबंधितांची तपासणी करून पात्र व्यक्तीसच पास देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.