सांगली : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांना दोन अतिरिक्त आयुक्तपदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात सांगलीचाही समावेश आहे. नुकतीच अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय लांघी यांची नियुक्ती केली होती. आता दुसऱ्या पदावर महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकाऱ्याला संधी मिळणार आहे. याबाबतचा अध्यादेश बुधवारी नगरविकास विभागाने जारी केला.
राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेत २०११ मध्ये अतिरिक्त आयुक्तपद निर्माण केले गेले. या पदावर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकाऱ्यांना या पदापासून वंचित राहावे लागत होते. त्यासाठी नगरविकास विभागाने ‘ड’ वर्ग महापालिकेत वाढीव अतिरिक्त आयुक्तपदाची निर्मिती केली आहे. या पदासाठी आस्थापनेवरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी अथवा तांत्रिक, लेखा विभागातील सक्षम अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सांगली महापालिकेची लोकसंख्या साडेपाच लाखाहून अधिक आहे. त्यामुळे आता दोन अतिरिक्त आयुक्त असतील. सध्या या पदावर दत्तात्रय लांघी यांची प्रतिनियुक्तीवर बदली केली आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर महापालिकेला अतिरिक्त आयुक्त लाभले होते. आता आणखी एक अतिरिक्त आयुक्त महापालिकेला मिळणार आहेत.