सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षीय आदेश डावलून विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या तसेच गैरहजर राहणाऱ्या सहा सदस्यांच्या विरोधात भाजपने अपात्रतेचा प्रस्ताव शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला. मतदान प्रक्रियेचा शासकीय अहवाल, सीडी तसेच न्यायालयीन खटल्याचे दाखले या प्रस्तावाबरोबर जोडण्यात आले असल्याची माहिती सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी दिली.
महापौर, उपमहापौर निवडीत भाजपच्या सहयोगी सदस्यांसह सात सदस्यांनी बंड केले होते. त्यापैकी भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नसिमा नाईक, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, अपर्णा कदम या चार सदस्यांनी विरोधी काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी व उमेश पाटील यांना मतदान केले होते, तर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे दोन सदस्य गैरहजर राहिले होते. परिणामी बहुमत असूनही भाजपचा सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. याची गंभीर दखल घेत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सहा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यामध्ये सदस्यांकडून समाधानकारक खुलासा न आल्याने त्यांच्या विरोधात अपात्रतेचा प्रस्ताव तयार केला होता.
शुक्रवारी हा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला. प्रत्येक सदस्याचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत बोलताना सभागृह तथा भाजपचे गटनेते विनायक सिंहासने म्हणाले, अपात्रतेचे प्रस्ताव दाखल केले आहेत. प्रस्तावाबरोबर मतदान प्रक्रियेचा शासकीय अहवाल, सीडी, आवश्यक पुरावे जोडण्यात आले आहेत. ॲड. प्रमोद भोकरे यांच्याकडे वकीलपत्र देण्यात आले. विभागीय आयुक्तांना कोरोनाची बाधा झाला आहे. येत्या आठवडाभरात ते पुन्हा कार्यभार स्वीकारतील. त्यानंतर सुनावणीसाठी नोटिसा पाठविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.