सांगली : महापालिका शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार दिला जात नसल्याची तक्रार करीत राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मुख्यालयात कटोरा घेऊन ठिय्या मारला. याबाबत थोरात म्हणाले की, महापालिकेच्या शाळांकडे प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहेत. कायम शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक शाळांत कंत्राटी शिक्षकांवर ताण आला आहे.
त्यात बचत गटांनी शालेय पोषण आहार देण्यास नकार दिला आहे. अनेक शाळांत गोरगरीबांची मुले शिकतात. त्यांना पोषण आहार मिळत नाही. जिल्हा परिषदेकडून तांदळांचा पुरवठा झालेला नाही. तरीही प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. गत महासभेत महापालिकेच्यावतीने मुलांना केळी व अंडी देण्याबाबत चर्चा झाली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आयुक्तांच्या साक्षीने त्याला सहमती दर्शविली. पण आता दोन महिने झाले तरी मुलांना अंडी व केळी दिलेली नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे सांगण्यात येत आहे. या भोंगळ कारभारामुळे महापालिकेच्या शाळा बदनाम होत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, याप्रश्नी थोरात यांनी आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून शालेय पोषण आहारातर्गंत ठेकेदारांना तांदूळ पुरवठा करण्याची सूचना केली.
थोरातांनी तक्रार करावीयाबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, महापालिका शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार मिळत नसल्याबद्दल एकही तक्रार आलेली नाही. नगरसेवक थोरात यांनी प्रशासनाच्या निदर्शनास अशी बाब आणून दिल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल.