सांगली : सांगलीतील प्रभाग १८ मध्ये खोदाईचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटून एका घरात पाणी शिरले. गळती रोखण्यासाठी येथील नगरसेवक अभिजीत भोसले यांनी खड्ड्यात उतरुन दुरुस्ती केली.
सोमवारी रात्री १० वाजता जलवाहिनी फुटली. त्यातून पाणी गळती सुरु झाली. पाण्याने खड्डा भरून शेजारी असलेल्या घरात पाणी घुसले. रात्रीच्या वेळेस प्लंबरही मिळेना. अशा वेळी पाणी गळती थांबवणे आवश्यक असल्याने स्थानिक नगरसेवक अभिजित भोसले स्वत:च खड्ड्यात उतरले आणि त्यांनी जमेल तसे पाईपचे तोंड बंद करुन गळती थांबवली.
प्रभाग १८ मध्ये ही घटना घडली. या भागात झोपडपट्टी भागात बरीच पत्र्याच्या शेडची घरे आहेत. ही घरे रस्त्यापासून उंचीने खाली असल्याने बऱ्याच घरात पाणी जाऊ शकत होते. एक दोन घरात पाणी जाण्यास सुरुवात झाली होती. अशावेळी पाणी गळती थांबवणे आवश्यक होते. रात्रीची वेळ असल्याने प्लंबर मिळत नव्हते. पाण्याचा व्हॉल्व बंद करायचा तर त्या भागात अंदाजे हजारभर घरांना पाणी मिळाले नसते. ही आणीबाणीची वेळ लक्षात घेऊन तेथे उपस्थित असलेले नगरसेवक भोसले स्वतः खड्ड्यात उतरले आणि सुमारे दोन तास प्रयत्न करुन त्यांनी जमेल तसे पाईपचे तोंड बंद करून पाणी गळती थांबवली. या गळतीमुळे काही कुटुंबांना रात्रीत होणाऱ्या त्रासातून वाचवल्याचे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया भोसले यांनी व्यक्त केली.