सांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागातील रस्ते पावसामुळे चिखलात रुतले असून नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. त्यांच्या आक्रोशाला सोमवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना सामोरे जावे लागले. शहरातील विविध ठिकाणी पाहणी दौऱ्यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना नागरिकांनी घेराव घातला, तर स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारून प्रशासनाचा निषेध केला. गेल्या चार दिवसांच्या पावसाने शहराची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: गुंठेवारी व उपनगरांतील रस्त्यांवर दलदल झाली आहे. मुख्य रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यात प्रशासनाने साडेतीन कोटी रुपयांच्या मुरूम, पॅचवर्कची निविदा अडवून धरल्याने नगरसेवकांतही नाराजीचा सूर आहे. महापौर हारूण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यासह गुंठेवारीतील नगरसेवकांनी सोमवारी सकाळी आयुक्त खेबूडकर यांची भेट घेऊन तातडीने मुरूम देण्याची मागणी केली. तसेच गुंठेवारी भागाचा दौरा करण्याचा आग्रह धरला. दुपारी आयुक्तांनी पदाधिकारी व नगरसेवकांसह शहराच्या विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. विश्रामबाग येथील दत्तनगरमधील रस्ते ड्रेनेज वाहिन्यांमुळे खराब झाले आहेत. तेथील नागरिकांनी तर आयुक्तांना घेरावच घातला. आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांनाही चिखल तुडवत पाहणी करावी लागली. नगरसेवक प्रदीप पाटील, मृणाल पाटील यांनी मुरूमाची मागणी केली. माधव कुलकर्णी, संजय कुलकर्णी यांनी, मुरूम कधी मिळणार, हे आताच जाहीर करा, अशी मागणी केली. त्यानंतर विधाता कॉलनी, टिंबर एरिया, सांगलीवाडी, शामरावनगर या परिसराला महापौर, आयुक्तांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी आयुक्त व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनीत नागरिकांनी, ‘रस्त्यावर चालून दाखवा’, असे आव्हानच आयुक्तांना दिले. (प्रतिनिधी)काँग्रेस, स्वाभिमानीचा पालिकेत ठिय्यामहापालिका मुख्यालयात स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी पावसाळी मुरूमासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच ठिय्या मारला. नागरिकांना तातडीने मुरूम उपलब्ध करून द्यावा, खड्डे मुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहर अभियंता आर. पी. जाधव यांनी, दोन दिवसात मुरूमाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळी, जगन्नाथ ठोकळे, संगीता खोत, अश्विनी खंडागळे यांच्यासह काँग्रेसचे दिलीप पाटील, प्रभाग समिती सभापती बाळासाहेब काकडे, राष्ट्रवादीचे मनगूआबा सरगर सहभागी झाले होते.
महापालिकेविरोधात नगरसेवक, नागरिकांचा आक्रोश
By admin | Published: July 04, 2016 10:08 PM