पावसाळा सुरू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी तसेच विस्तारित भागात पाण्याचा निचरा होत नाही. अनेक ठिकाणी ड्रेनेजची समस्या आहे. रस्ते खराब आहेत. त्यामुळे नागरिकांना दलदलीतून वाट काढावी लागते. परिणामी नागरिक स्थानिक सदस्यांना धारेवर धरतात. हे लक्षात घेत पावसाळा कालावधीतील अत्यावश्यक कामांसाठी आयुक्त कापडणीस यांनी प्रभाग विकास निधीमधून प्रत्येक सदस्याला पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून प्राधान्याने मुरूम टाकणे, रस्ते दुरुस्त करणे, क्रॉस पाईप टाकणे, रोड साईड ड्रेन्स (गटारी) तयार करणे, आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी सदस्यांनी संबंधित प्रभाग समितीकडील नगर अभियंता यांच्याकडे कामांची लेखी स्वरूपात मागणी करावी. प्रस्ताव तयार करावेत. तांत्रिक मान्यता घ्यावी, त्यानंतर ते प्रस्ताव मंजुरीसाठी सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावेत, अशा सूचना कापडणीस यांनी सर्व सदस्यांना पत्राद्वारे केल्या आहेत. दरम्यान, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त अन्य कोणतीही कामे मंजूर केली जाणार नाहीत, असेही कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.