वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याने १३.६० टक्के साखर उतारा गाठला होता. आता १२.०८ टक्के आहे. जिल्ह्यांतील १८ साखर कारखान्यांमध्ये हा खूपच खालच्या पातळीवर साखर उतारा आहे. रिकव्हरी खाली आली का लपवली गेली? लपवली असेल तर कारखान्यावर हा राजरोस दरोडाच आहे, टीका हुतात्मा साखर कारखाना नंदकुमार शेळके व चंद्रशेखर शेळके यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, हुतात्मा कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून सहकाराचा खून करीत आहेत. हुतात्मात त्यांचा भ्रष्ट व हुकूमशाही कारभार सुरू आहे. त्यामुळे कारखाना आज ३०० कोटींच्या कर्जात आहे. त्याचे व्याज भागविणे सुध्दा दमछाकीचे झाले आहे. कुठलेही बायप्रोडेक्ट नसताना नुसत्या साखरेच्या उत्पादनावर संस्थापक डाॅ. नागनाथआण्णांनी उच्चांकी ऊस दर शेतकऱ्यांना दिला. आण्णांच्या नंतर वैभव नायकवडी यांनी दारू, इथेनाॅल, उपपदार्थ निर्माण केले, पण उसाला जादा दर देणेचे सोडाच उलट कारखाना कर्जबाजारी करून ठेवला आहे. त्यामुळे व्याज व ऊस बिले देणे सुध्दा अवघड झाले आहे.
साडेसहा ते साडेसात लाख टन ऊस गाळप करणारा कारखाना साडेपाच लाख गाळपावर आला आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागले आहेत. मेन्टेनन्स करताना भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम केल्याने कारखाना यावर्षी अनेकदा बंद पडला आहे. वैभव नायकवडी यांनी नागनाथआण्णांच्या सर्व परंपरा मोडीत काढल्या असून त्यांचे विचार व तत्वे पायदळी तुडवली आहेत.