याबाबत अधिक माहिती अशी, नरसेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वित्त आयोगाच्या निधीतून वेगवेगळ्या प्रकारची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. साहित्य खरेदी करताना शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातून करणे आवश्यक होते. सरपंच आणि सरपंच पती, ग्रामसेवक यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य संस्थेकडून ४ लाख ९० हजार रुपये किमतीची साहित्य खरेदी करण्यात आली आहे.
टेबल, खुर्ची, पंखे, कपाट, शालेय साहित्य असे अनेक प्रकारचे साहित्य खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या साहित्याची मूळ किंमत कमी असताना, दुप्पट दराने साहित्य आकारणी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या साहित्य खरेदीची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संदीपान सूर्यवंशी, सुनील जाधव, शरद गुरव या तीन ग्रामपंचायत सदस्यांसह मोहन जाधव, राहुल जाधव, विजय खराडे यांनी याबाबत तक्रार केली आहे. सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
सरपंच पतीच्या उचापती :
नरसेवाडी ग्रामपंचायतीत महिला सरपंच आहेत; मात्र महिला सरपंचांच्या ऐवजी त्यांच्या पतींच्या सातत्याने उचापती सुरू असतात. साहित्य खरेदीत देखील सरपंच आणि त्यांच्या पतीचा सहभाग असल्यामुळे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली असून या उचापती थांबवाव्यात अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.