निवास पवार
शिरटे : कोरोना संसर्गाच्या महामारीने अनेकांना मेटाकुटीला आणले आहे. शेतकऱ्यांना तर त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांची विविध पिके दराअभावी आणि ग्राहकांअभावी सडून गेली. येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शेतकरी अधिक जयसिंग पाटील यांनी दराअभावी त्यांचे दोन एकर शेतातील रताळांचे क्षेत्र बुधवारी ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमीनदोस्त करून टाकले.
लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला. बाजार भरविण्यावर बंदी असल्याने शेतीमालाला दरही मिळेना. त्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांनी उत्पादित केलेला माल डोळ्यादेखल कुजून जाताना पाहावा लागला. जो काही माल हाताला लागला, त्याला दरही मातीमोल मिळत होता. त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित चांगलेच कोलमडले आहे.
साधारणत: चार महिन्यांच्या कालावधीचे असणारे रताळे हे पीक आर्थिक उत्पन्नाबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत करीत असते. डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान रताळांची लावण केल्यास मे महिन्यात परिपक्व रताळांची काढणी होते. गतवर्षी या महिन्यातील रताळांचा किलोचा दर सव्वीस ते तीस रुपये होता. पण सध्या देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. बाजारपेठेत शाश्वतीचा व हमीचा दर नसल्याने भाडेखर्च मिळणेही मुश्किल होत आहे.
सध्या अनेक शेतकºयांचे रताळी काढणीचे काम सुरु आहे. मुंबई व पुण्याच्या बाजारपेठेत रताळांची उलाढाल होत असते. परंतु लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प आहेत. दराबाबत व्यापाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी मालाच्या प्रतीनुसार सहा ते दहा रुपये प्रतिकिलो दर, तसेच पन्नास किलोच्या पोत्याला दोनशे रुपये वाहतूक भाडे सांगितले आहे. लावणीपासून काढणीपर्यंतचा व पुन्हा बाजारपेठेत माल पोहोचवेपर्यंतचा खर्च काढल्यास, हाती काय? हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत असल्यानेच पाटील यांनी रताळ्याचे काढणीला आलेले पीक शेतातच मुजविण्याचा निर्णय घेतला आहे.