शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून साहित्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वर्षाला एक कोटी रुपयांचा खर्च करूनही साहित्याअभावी शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. अगदी सणासुदीला नागरिकांच्या नशिबी अंधारच आला होता.
राज्य शासनाने एलईडी पथदिवे बसविण्याबाबत मध्यंतरी आदेश काढला होता. त्याचा ठेकाही एका कंपनीला दिला होता. याच कंपनीकडून एलईडी दिवे बसविण्याची शिफारसही केली होती. पण महापालिकेने हा निर्णय मान्य केला नाही. त्यामुळे सध्या खराब झालेले पथदिवे बंदच पडले आहेत. गेल्या दोन वर्षापासून हा विषय गाजतो आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही सभागृहात त्यावर आवाज उठविला आहे. पण अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही.
महापालिकेला ट्युब, चोक, बल्ब आदी खरेदीची मुभा आहे. त्यासाठी वर्षाला एक कोटी रुपयांचा खर्च केला जातो. पण हे साहित्य कधी विद्युत विभागाकडे येते आणि त्याचे वाटप कधी होते, हेच आजअखेर समजलेले नाही. नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर साहित्याचा पुरवठा झाला नसल्याचे कारण दिले जात आहे. यंदाही महापालिकेने चार प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एक कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. पण आजअखेर साहित्य काही मिळालेले नाही. एका प्रभागात काम सुरू झाल्याचे सांगण्यात येते. शासन व महापालिकेच्या गोंधळामुळे शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. चोऱ्या, मारामाऱीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनीही त्यावर आंदोलन केले, पण झोपेेचे सोंग घेतलेल्या विद्युत विभागाला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येते.
चौकट
माहितीची लपवाछपवी
गेल्या दोन ते तीन वर्षात विद्युत विभागाकडे किती साहित्य आले, ते कोणाला दिले, ट्युब, बल्ब व इतर साहित्य कुठे बसविले याची माहिती मागविली होती. पण आजअखेर विद्युत विभागाकडून त्यावर कसलेच उत्तर देण्यात आलेले नाही. निव्वळ लपवाछपवी सुरू आहे. विद्युत साहित्याची मागणी केली, पण पुरवठा नसल्याचे कारण दिले जाते. याविरोधात सभागृहात आवाज उठविणार असल्याचे नगरसेवक मनोज सरगर यांनी सांगितले.
चौकट
महापालिका क्षेत्रातील पथदिवे : ३० हजार
बंद असलेले पथदिवे : ३ हजारहून अधिक