सांगली : जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खूनातील चार संशयितांवर मोका कायद्यातर्गंत कारवाई करण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली. या खूनातील मुख्य संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत अद्यापही फरार आहे.टोळी प्रमुख संदिप उर्फ बबलु शंकर चव्हाण (वय २७, रा. मोरे कॉलनी, जत ), आकाश उर्फ अक्षय सुधाकर व्हनखंडे ( २४, रा. सातारा रोड), किरण विठ्ठल चव्हाण (२७, रा. आर. आर. कॉलेजजवळ), निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने (२४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) अशी मोका लावलेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की. जत येथे भाजपचे नगरसेवक विजय ताड यांचा राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवक उमेश सावंत याने संदीप चव्हाणसह चार जणांच्या मदतीने गोळ्या घालून व डोक्यात दगड मारून खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी चारही संशयितांना अटक केली होती. मुख्य संशियत उमेश सावंत अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.दरम्यान अटकेतील चारही संशयितांवर जत, मिरज ग्रामीण, सांगली ग्रामीण व विश्रामबाग पोलिस ठाण्यात दरोडा. जबरी चोरी, घरफोडी, खंडणी, खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, गर्दी, मारामारी, सरकारी कामात अडथळा असे विविध गुन्हे दाखल आहेत. २०१४ पासून ही टोळी संघटित गुन्हेगारी करीत आहेत.
संशयितांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी चौघांविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातंर्गंत वाढीव कलम लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविला होता. फुलारी यांनी कायदेशीर बाबीची पडताळणी करून चारही संशयिताविरूद्ध मोका कायदा लागू करण्यास मंजुरी दिली.