कुंडल येथे जी. डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतिअग्रणी’ पुरस्काराने सन्मानकुंडल : भविष्यात जे देश नवनवीन संशोधन करणार नाहीत, ते कदाचित नष्ट होतील. नवीन पिढीने चांगले ज्ञान आत्मसात केले तर, भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या नंबरची होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी विजय भटकर यांना पुणे विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याहस्ते क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.भटकर म्हणाले, भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. या संस्कृतीने पूर्ण जगाला दिशा दिली आहे. तिचा आजच्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. चांगले ज्ञान आत्मसात करताना अडचणी अनेक येतील; परंतु त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. आज देश तंत्रज्ञानाची अनेक मोठी पावले उचलत आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून होणे आवश्यक आहे.
प्रभाकर देशमुख म्हणाले, डॉ. विजय भटकर यांच्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. स्वातंत्र्यापूर्वीच कुंडल परिसर स्वतंत्र झाला होता; कारण येथे इंग्रजांचे नाही, तर स्वातंत्र्यसैनिकांचे राज्य होते. या देशाची संस्कृती ज्ञानावर आधारित असल्याने आज आपण वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत आहोत.
अरुण लाड म्हणाले, या व्याख्यानमालेमुळे ‘क्रांती’ने लोकप्रबोधनाचा जागर चालू केला. यातून क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना अपेक्षित असा समाज घडेल, अशी अपेक्षा आहे. यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, अॅड. प्रकाश लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, अॅड. सयाजी पाटील, पी. आर. पवार, प्रकाश पाटील, बाळासाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, बाबूराव गुरव, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, सचिन कदम, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटोळे, शामराव नवले, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, छायादेवी पवार, प्रमिलाताई लाड, अलका लाड, सुनंदाताई लाड, अंजली कदम, सरपंच प्रमिला पुजारी, बापूसाहेब जाधव, संजय जाधव, दिलीप जाधव उपस्थित होते. प्रा. नवनाथ गुंड यांनी मानपत्र वाचन केले, जयवंत आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. जी. के. जाधव यांनी आभार मानले.
जी. डी. बापूंची प्रेरणा घ्यावी!जगात जे काही शास्त्रज्ञ शोधकार्यात आहेत, त्यातील बहुतांश आपल्या देशातील आहेत, याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. नव्या पिढीने याचा बोध घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अडचणी न सांगता जी. डी. बापू यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवावे, असे आवाहन डॉ. भटकर यांनी केले.