सांगली : कोव्हॅक्सिन लसीचे ४ हजार ८०० डोस जिल्हा परिषदेला रविवारी मिळाले होते, त्यातून दुसरा डोस देण्याचे काम मंगळवारी व बुधवारीदेखील सुरू राहणार आहे. लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी ही माहिती दिली.
कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने दुसरा डोस घेण्यासाठी लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागत आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी तो घ्यावा लागतो. त्यासाठी रविवारी जिल्ह्याला पुरवठा झाला. डॉ. पाटील यांनी आवाहन केले की, १८ ते ४४ वयोगटातील पहिल्या डोसला २८ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थींनी दुसरा डोस घ्यावा. त्यासाठी १४ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत सोय केलेली आहे. त्याशिवाय महापालिका क्षेत्रात
जामवाडी, हनुमाननगर, समतानगर, मिरज मार्केट व कुपवाड रुग्णालयांतही लस मिळणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्राला २०० डोस पुरवले आहेत. तेथे फक्त दुसरा डोस मिळेल.
दरम्यान, कोविशिल्डचे ५००० डोस मंगळवारी मिळतील, त्यातून ४५ वर्षांवरील वयोगटाला पहिला डोस देण्याचे काम मंगळवारी व बुधवारी सुरू राहणार आहे. सोमवारी दिवसभरात ३ हजार ६५ जणांचे लसीकरण झाले. ३४५ ते ६० आणि त्यापुढील वयोगटाला कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. आजवरचे लसीकरण ७ लाख २४ हजार ३६० इतके झाले.