सांगली : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ माकपच्यावतीने सांगलीत शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
सांगलीच्या स्टेशन चौकात दुपारी साडे बारा वाजता आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून केरळ राज्यात संघाच्या गुंडांनी उच्छाद मांडला आहे. भाजपाच्या अध्यक्ष अमित शहा यांची केरळ यात्रा अशस्वी झाल्याने त्यांचे पित्त खवळले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मतदारसंघात शहांचे स्वागत कडकडीत बंदने करण्यात आले होते. त्यामुळे शहा यात्रा अर्ध्यातच सोडून दिल्लीला परतले. त्यानंतर दोनच दिवसात भाजप व संघाच्या गुंडांनी कुन्नुर येथे माकपच्या व कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केला. यात २३ जण जखमी आहेत. भाजपच्या कार्यालयात शस्त्रसाठाही सापडला होता.
डेहराडून येथील पक्ष कार्यालयावरही असाच हल्ला करून कॉ. शेरसिंह यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. पल्लकडा, दक्षिण बेंगलोर येथील माकप कार्यालयांवरही हल्ला करण्यात आला. त्रिपुरातील सीपीएमच्या पाच कार्यकर्त्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले.
एवढे करून चोराच्या उलट्या...म्हणीप्रमाणे अमित शहा सीपीएमच्या कार्यालयावर मोर्चे काढत आहेत. त्यांनी हे ढोंग ताबडतोब बंद करावे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनात कॉ. उमेश देशमुख, तुळशीराम गळवे, कॉ. बेबीजोहरा नदाफ, जयकुमार सकळे, कॉ. दिगंबर कांबळे, कॉ. दिलीप कांबळे आदी सहभागी झाले होते.