सांगली : जलदिन दिनांक 22 मार्च रोजी साजरा केला जातो . सन 2021 च्या जलदिनानिमित्त दि. 22 ते 27 मार्च जलसप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. 23 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातून सांगलीच्या जनतेस जल चळवळ उभी करावी, असे आवाहन केले.अटल भुजल योजना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या चार तालुक्यातील एकूण 92 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेस संबंधित तालुक्यातील तहसिलदार व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
या जल चळवळीस लोकसहभागाची जोड देवून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे तहसिलदार खानापूर यांनी यावेळी आश्वासित केले. गट विकास अधिकारी कवठेमहांकाळ, जत तसेच तासगाव यांनी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून योजना प्रभावीपणे राबवू असे सांगितले.तसेच जागतिक जल दिन 22 मार्च, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयात जल प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेत असताना जलदिनानिमित्त जनजागृती हेतू ठेवून निरीक्षण विहिरींची माहिती संबंधित गावातील गावकऱ्यांना देण्यात आली, यामध्ये भूजल पातळी कशी मोजली जाते याची ग्रामस्थांना माहिती दिली.
याचबरोबर सांगली आकाशवाणी केंद्राला, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसकी यांनी मुलाखतीद्वारे जनजागृती केली. यामध्ये अटल भुजल योजनेच्या अनुषंगाने ही माहिती प्रसारित करण्यात आली. दैनंदिन वापरामध्ये पाण्याची होऊ शकणारी बचत यावर चर्चा झाली. पाण्याचे प्रदूषण थांबवून पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना जनतेचा प्रतिसाद अत्यावश्यक असल्याने, जनतेच्या सक्रीय सहभागासाठी आवाहन करण्यात आले.सध्या कोवडि-19 च्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप द्वारे सुरू असणाऱ्या शाळांच्या ग्रुपवर पाण्याचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ पाठवण्यात आले. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी व्हाट्सअप स्टेटसला पाण्याचे महत्व सांगणारे चित्रे, व्हिडिओ लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.