सांगली : हिंदू राष्ट निर्मितीसाठी भाजप आणि आरएसएसकडून शिवप्रतिष्ठानचे मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांचा वापर करण्याचे नवे तंत्र अवलंबिले जात आहे. यापूर्वीच्या दंगलीतही भिडे व एकबोटे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. कोरेगाव-भीमा येथील दंगल पूर्वनियोजित होती, असा आरोपही त्यांनी केला.
सकटे म्हणाले की, कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण महाराष्टÑात चिंतेचे सावट निर्माण झाले होते. यामध्ये एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. याला जबाबदार कोण? या दंगलीमागे संभाजीराव भिडे, मिलिंद एकबोटे व नाशिकचे घुगे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानुसार पोलिसांनी भिडेंसह एकबोटेंवर गुन्हा दाखल केला आहे. पण अजूनही त्यांना अटक केली नाही.
या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंद आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कोरेगाव-भीमाची घटना पूर्वनियोजित घडविण्यात आली आहे.
दंगली घडवून निवडणुका जिंकण्याचा भाजपने नवा फंडा सुरु केला आहे. भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवप्रतिष्ठानने सांगलीत मोर्चा काढला. या मोर्चावेळी जिल्हाधिकाºयांनी भिडेंना वाकून नमस्कार केला. जिल्हाधिकाºयांना हे अशोभनीय आहे.
सकटे म्हणाले की, मोदी सरकारने अच्छे दिनचे आमिष दाखवून सत्ता मिळविली; पण अच्छे दिन अजूनही आले नाहीत. दररोज महागाई वाढत आहे. त्यावर कोणीही चर्चा करीत नाही. चर्चा केवळ आरक्षणावरच सुरू आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर कोणीही बोलत नाही. देशात प्रत्येक तीन मिनिटाला दलितांवर अत्याचार होत आहे.
लोकभावनेशी खेळ करून सरकारने जनतेची थट्टा चालविली आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या सरकारच्या कामाबद्दल कोणीही समाधानी नाही. या सर्वच बाबींचा जाब सरकारला वेळीच विचारण्याची गरज आहे. यासाठी दलित महासंघाच्यावतीने राज्यभर भारत बचाव परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. त्याची सुरुवात सांगलीतून १३ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यमंदिरमध्ये केली जाणार आहे. यासाठी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, प्रवीण गायकवाड, डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाबूराव गुरव यांना आमंत्रित केले आहे.भिडेंचा कसला त्याग?सकटे म्हणाले की, संभाजीराव भिडे पायात चप्पल घालत नाहीत, पण त्यांच्या डोक्यावर टोपी असते, असे ऐकले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हेही चप्पल घालत नव्हते, तसेच त्यांच्या डोक्याला टोपीही नसायची. कर्मवीरअण्णांचा हा फार मोठा त्याग होता. तो भिडेंनी पाहावा.