कवठेमहांकाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या कोळे (ता. सांगोला) येथील विलास भास्कर शेटे यांचा त्यांच्या पत्नीने पाच लाखाची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ पोलिसांत अटकेत असलेल्या अमर आटपाडकर याच्या चौकशीतून मंगळवारी उजेडात आला. याप्रकरणी आटपाडकरच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.महेंद्र ऊर्फ महेश महादेव माने (वय २९) व तगदीर शशिकांत कांबळे (२३, दोघे रा. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आटपाडकरला दोन दिवसांपूर्वी बेकायदा पिस्तूलप्रकरणी अटक केली होती. त्याच्या चौकशीत शेटे यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उलगडले.
पंढरपूर-सांगोला महामार्गावर बुध्याळ तळेगावलगत ५ आॅगस्ट २०१८ रोजी विलास शेटे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांची दुचाकी पडलेल्या स्थितीत आढळून आली होती. शेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. शेटे यांची पत्नी सारिका हिचे गावातील तायाप्पा सरगर याच्याशी अनैतिक संबंध होते. याची कुणकुण शेटे यांना लागल्याने, त्यांनी सारिकाला समजावून सांगितले.
तरीही तिने तायाप्पासोबतचे संबंध सुरूच ठेवले होते. यातून त्यांच्यात वाद होत असे. अनैतिक संबंधातील पतीचा अडसर दूर करण्यासाठी सारिकाने सांगोल्यातील पप्पू करचे यास पाच लाखाची सुपारी दिली होती. करचे याने अमर आटपाडकर, महेश माने, तगदीर कांबळे यांची मदत घेऊन शेटे यांच्या खुनाचा कट रचला.
विलास शेटे ५ आॅगस्ट रोजी पहाटे साडेपाचला दुचाकीवरून जात होते. संशयित त्यांच्यावर पाळत ठेवून होते. शेटे पंढरपूर-सांगोला रस्त्यावर आल्यानंतर संशयितांनी त्यांच्यावर पाठीमागून हॉकी स्टिकने हल्ला केला. जोराचा मार बसल्याने ते खाली पडले. त्यानंतर महेंद्र माने याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. अमर आटपाडकर व तगदीर कांबळे यांनी मोटारीने (क्र. एमएच १२ एफयू-३७८९) शेटे यांना चिरडले. शेटे यांचा मृत्यू अपघाती भासविण्यासाठी संशयितांनी त्यांच्या मृतदेहावर दुचाकी पाडली होती. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतरच संशयित पसार झाले.
पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक निरीक्षक विकास जाधव, पोलीस नाईक आनंदा जाधव, प्रमोद रोडे, महेश नरूटे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.सांगोल्याकडे गुन्हा वर्गशेटे यांचा खून सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. त्यामुळे हा गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला जाणार आहे. महेंद्र माने व तगदीर कांबळे यांना सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. आटपाडकर हा बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटकेत आहे. आमचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.