लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संमेलनातील पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना मोरे बोलत होते.ते म्हणाले की, धर्मांच्या निर्मितीचा अभ्यास केला, तर सर्व धर्मांचे सांस्कृतिक धागे जोडल्याचे दिसून येते. धर्माला पूर्वी कोणतेही नाव नव्हते. यज्ञ व कर्मकांड करण्यास धर्म मानले जात होते. वैदिक हा शब्द या तत्त्वाला विरोध झाल्यानंतर निर्माण झाला. त्यामुळे एकाच संस्कृतीतून वेगवेगळे धर्म जन्माला आले. कालांतराने धर्मांचा एकमेकांवर प्रभाव पडत गेला आणि काही गोष्टींची देवाण-घेवाणही झाली. भारतीय इतिहास पाहिला, तर औरंगजेब, अकबर यांच्या दरबारात बहुतांश हिंदू सरदार आणि हिंदू राजांच्या दरबारी असलेले मुस्लिम सरदार, असे चित्र होते. संगीत क्षेत्रात आजवर अनेक मुस्लिम गायकांनी काळ गाजविला. इब्राहीम अदिलशाह (द्वितीय) या राजाने शास्त्रीय गायनातून हिंदू देवांचा उल्लेखही स्वीकारला होता. त्यामुळे तेव्हाचा संघर्ष आणि लढा हा धर्मांचा होता की राजांमधील होता, याची चिकित्सा प्रत्येकाने करावी.जगातील धर्मांनी आत्म्याच्या मरणोत्तर अस्तित्वावर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. त्याचबरोबर धर्मांनी अलौकिक गोष्टींवरही विश्वास ठेवला. कबिरांनी एकाचवेळी हिंदू आणि मुस्लिम धर्मातील चुकीच्या तत्त्वांवर प्रहार केल्याचे दिसून येते. एकमेकांशी संघर्ष करणारे, स्वतंत्र परंपरा पाळणारे हे धर्म आहेत. तरीही त्यांचा एकमेकांवर प्रभाव दिसून येतो. भारतातील समाधानकारक बाब म्हणजे, याठिकाणी कधीही धर्मयुद्ध झालेले नाही. अन्य देशांमध्ये अशी धर्मयुद्धे नोंदली गेली आहेत. संत एकनाथांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’ या नावाने एक भारुड रचले होते. हिंदू-मुस्लिम लोकांमधील युक्तिवाद आणि शेवटी एकमेकांच्या धर्मांचा आदर, अशी त्याची रचना होती. त्यामुळे संतांनीही वेगवेगळ्या पद्धतीने धर्मचिकित्सा केल्याचे दिसून येते. मार्क्स, गांधी आणि आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या विचारात मतभेद होते. तत्त्वाने ते भांडत होते, म्हणून त्यांच्या अनुयायांनीही भांडायलाच हवे का? विचारांचा वारसा घ्यायचा की भांडणाचा, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे ते म्हणाले.दुसºया सत्रात ‘मार्क्सची धर्मकल्पना’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र कांगो म्हणाले की, माणूस धर्माला घडवितो, धर्म माणसाला नव्हे.देशात आता पुन्हा जातीच्या नावाने लोक एकत्र येत आहेत. जातीव्यवस्थांचे पुनरुज्जीवन का होत आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे भांडवलशाही व्यवस्थाच हृदयशून्य जग निर्माण करू पाहत असते. त्यासाठी धर्माला दावणीला बांधले जाते. सारासार विवेकबुद्धी काढून घेण्याचे काम धर्म करीत असतो. धार्मिक भावना आणि उन्माद यात फरक करायला हवा. हिंदू हा धर्म आहे, तर हिंदुत्व हे राजकारण आहे. सध्या ही रचना संघामार्फत केली जात आहे. धर्म-जातींमधील सामंजस्यपणा कमी करणाºया शक्ती बळावत आहेत. धर्माच्या नावावरील अधर्म थांबविला पाहिजे, असेही ते म्हणाले.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या भाषणाने समारोप झाला. यावेळी प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुभाष दगडे, दादासाहेब ढेरे, संयोजक गौतम पाटील, फोरमचे सचिव बी. आर. थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून पुरोगामी कार्यकर्ते आले होते.
एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:32 PM