सांगली : दरवर्षी पावसाळ्यात सिमेंटच्या किमती कमी होत असतात, मात्र केवळ नफेखोरीसाठी सिमेंट कंपन्यांनी यावर्षी ऐन पावसाळ््यात कृत्रिम भाववाढ करून बांधकाम व्यवसायास वेठीला धरले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ सांगली क्रेडाईतर्फे २५ जुलैपर्यंत ‘ना सिमेंट खरेदी सप्ताह’ पाळण्यात येणार असल्याचे क्रेडाईने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, वास्तविक सिमेंट उत्पादनासाठी लागणाऱ्या कोणत्याही कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झालेली नाही. रेल्वे वाहतुकीत झालेली दरवाढ लक्षात घेता हे दर दहा ते बारा रुपयांनी वाढणे आवश्यक होते. तसेच मागणी आणि पुरवठा याच्यात मोठी दरी निर्माण झालेली नसताना कंपन्यांनी ही अन्यायकारक व अतार्किक दरवाढ केलेली आहे. जून महिन्यात सिमेंटचे भाव प्रति गोणी २४0 ते २७0 रुपये होते. मात्र जून अखेरीस सदर भाव प्रति गोणी ३00 ते ३३0 इतके वाढले आहेत.नफेखोरीसाठीच ही वाढ करण्यात आली आहे. सिमेंट उत्पादकांकडून दर दोन ते तीन वर्षानी असा संघटित दरवाढीचा फंडा अवलंबिला जातो. जो निकोप स्पर्धेच्या तत्त्वांविरुध्द आहे. मुळात रेडिरेक्नरमधील वाढ खडी, वाळू यांच्या दरातील वाढ, त्यातच सिमेंटचे दर वाढल्याने प्रति चौरस फूट बांधकामाचे दर किमान शंभर रुपयांनी वाढणार आहेत. कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न आवाक्याबाहेर केले आहे. याच्या निषेधार्थ हा सप्ताह पाळण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘के्रडाई’तर्फे २५ पर्यंतना सिमेंट खरेदी सप्ताह
By admin | Published: July 16, 2014 11:27 PM