जत : माजी आमदार विलासराव जगताप यांनी मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय आमदार विक्रम सावंत घेत आहेत. अधिकाऱ्यावर दबाव आणून काम करून घेतले जात आहे. काम न ऐकणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, तमन्नगौडा रवीपाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पवार, प्रभाकर जाधव, नगरसेवक उमेश सावंत, लक्ष्मण जखगोंड, आदी उपस्थित होते.
डीपीडीसी बैठकीत आमदार निमंत्रित म्हणून असतात. आम्ही जनतेमधून निवडून आलेले सदस्य असतो. आम्हाला आमच्या अधिकारानुसार निधी मिळालेला आहे. त्यामुळे आमदार सावंत यांनी त्यांचे श्रेय घेऊ नये. म्हैसाळ योजना जत तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या योजनेसाठी आमदार विक्रम सावंत यांनी मागील १४ महिन्यांत फक्त एक कोटी रुपये आणले आहेत. माजी आमदार विलासराव जगताप यांनी ३५० कोटी रुपयांचा निधी आणला होता. कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे गाजर दाखविण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. जिल्हा परिषदेमधून भाजपच्या सदस्यांनी ४३ टक्के निधी जत तालुक्यासाठी आणला आहे, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
चौकट
राज्य सरकारकडून फसवणूक
शेतकऱ्यांची वीज तोडू नये असे शासनाचे आदेश होते; परंतु अधिवेशन संपल्यानंतर वीज तोडण्याचे आदेश देऊन शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असताना त्यांची वीज तोडून त्यांना संकटात टाकण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे, असा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी बोलताना केला.