आष्टा : बापूसाहेब शिंदे नागरी पतसंस्थेने आष्टा सहकार पंढरीत सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पतसंस्था फेडरेशनचे प्रश्न सोडविण्यासाठी जानेवारीत पुण्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे. पतसंस्था कर्मचाऱ्यांना विभागवार प्रशिक्षण देण्यासाठी जाचक अटी शिथिल करण्यात येतील, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
आष्टा येथील बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नूतन वास्तूचे उद्घाटन व ध्यासपर्व स्मरणिकेचे प्रकाशन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले , महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सहकार वाढला, तो टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी गरजेची असून, मार्केट कमिटीने आधारभूत किंमत देऊन जी विश्वासार्हता जपली आहे, त्याप्रमाणे दुसरी व्यवस्था अद्याप निर्माण झालेली नाही. भाजप महाराष्ट्रासह गल्लीबोळात केंद्राचा कृषी कायदा योग्य असल्याचे पटवून देण्यासाठी फिरत आहे आणि दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत.
यावेळी पी. आर. पाटील, विजय पाटील, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, माणिक शेळके, संग्रामसिंह पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, तहसीलदार रवींद्र सबनीस, दिलीप वग्यानी, झुंजारराव पाटील, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, तेजश्री बोंडे, अमित कदम, सरोजिनी शिंदे, राजाराम जाखलेकर, नियाजुलहक नायकवडी उपस्थित होते.
चौकट :
केंद्र सरकार खासगीकरणास प्राधान्य देत आहे. ग्रामीण भागातील पतसंस्था सहकार मोडण्याचा केंद्राचा डाव आहे. खासगी क्षेत्राशी स्पर्धा करण्यासाठी सहकारातील कायदे सक्षम करण्याची गरज आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
फोटो-२८आष्टा१
फोटो ओळ : आष्टा येथील बापूसाहेब शिंदे पतसंस्थेच्या रोप्य महोत्सवानिमित्त ध्यासपर्व या स्मरणिकेचे प्रकाशन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विराज शिंदे, पी. आर. पाटील, राजाराम जाखलेकर, विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.