शिराळा : सचिन तेंडुलकरचे मोठे कटआऊट, ‘तेंडल्या, तेंडल्या’ अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेलेले, गावाच्या वेशीपासून प्रत्येक गल्लीत रांगोळी, घरांसमोर गुढ्या, डोक्यावर ‘तेंडल्या’ची टोपी, पालखीसह जल्लोषी शोभायात्रा, महिलांकडून केले जाणारे औक्षण... सोमवारी असे चित्र होते शिराळा तालुक्यातील औंढी या गावी. औचित्य होते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे.औंढी या छोट्या गावात पाच वर्षांपूर्वी ‘तेंडल्या’ या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. तो आता ५ तारखेस प्रदर्शित होत आहे. कलाकार-तंत्रज्ञ इस्लामपूर-शिराळा या परिसरातले. गावाशी जोडल्या गेलेल्या या ओळखीमुळेच क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस जल्लोषी व उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावात गुढ्या उभारल्या होत्या. गुढ्यांवर बॅट लावून त्यावर ‘तेंडल्या’चे स्टीकर चिकटवलेले. संपूर्ण गावात रांगोळी काढून मंगलमय वातावरण निर्मिती करण्यात आलेली.घराघरात गोडधोडाचा बेत होता. सकाळी दहाच्या दरम्यान एका पालखीमध्ये सचिनचा पुतळा ठेवून लेझीम-हलगीच्या तालावर सर्व गावातून शोभायात्रा काढली गेली. सगळं गाव फेटे बांधून सहभागी झालेले. यावेळी महिलांनी पुतळ्याचे औक्षण केले. फुलांची उधळण, लेझीम, टाळ-मृदंगाच्या तालात ही शोभायात्रा ग्रामपंचायतीजवळ आली.तेथे सचिनच्या मोठ्या कटआऊटचे अनावरण करण्यात आले. सचिनच्या आवडत्या शंभर वडापावांचा नैवेद्य दाखवून त्याच्या शंभर शतकांना सलाम करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, ‘तेंडल्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव, चैतन्य काळे, नचिकेत वाईकर, मुख्य कलाकार फिरोज शेख व अमन कांबळे, संजय कांबळे, राजू कांबळे, बाबासाहेब पाटील, मोहन पाटील, सरपंच चेतन पाटील, सुहास पाटील उपस्थित होते.सेलिब्रेशनसाठी हेच गाव का निवडले?‘तेंडल्या’ चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण औंढी गावातच झालेले. शेजारच्या करमाळे, आंबेवाडी, निगडी, शिराळा, रिळे, धामवडे आदी गावांतही काही भाग चित्रित झालेला. या चित्रपटाला एक राष्ट्रीय आणि पाच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. ‘तेंडल्या’चे दिग्दर्शक सचिन जाधव यांचे बालपण औंढीतच गेले. सिनेमातील अनेक घटना या गावात घडलेल्या असल्याने सचिन तेंडुलकरचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी या गावाची निवड करण्यात आली. निर्मिती प्रक्रियेत गावाचे योगदान मोठे असल्याची भावना सचिन जाधव यांनी व्यक्त केली.
Sachin Tendulkar's 50th birthday: घरांसमोर गुढ्या, पालखीसह जल्लोषी शोभायात्रा; सांगलीतील औंढी गावाने साजरा केला सण
By श्रीनिवास नागे | Published: April 24, 2023 4:12 PM