सांगली : दोन मिनिटांसाठी मोबाइल व दुचाकीची मागणी करत ती परत न देता तरुणाची फसवणूक करण्यात आली. दुचाकीच्या बदल्यात ५० हजार रुपयांचीही मागणी करण्यात आली. या प्रकरणी नीलेश आप्पासाहेब पवार (वय १९, रा. गणेशनगर, कवठेमहांकाळ) याने ऋतुराज उमाजी शिरतोडे (वय २५, रा.विद्यानगर, मिरज) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, २७ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी नीलेेश व संशयित ऋतुराज यांची शहरातील आझाद चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी संशयिताने दोन मिनिटात गाडी व मोबाइल आणून देतो, म्हणून नीलेशकडून त्याची दुचाकी व माेबाइल घेतला. त्यानंतर, मोबाइल व दुचाकीबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, ‘५० हजार रुपये दे, अन्यथा गाडी जाळून टाकतो,’ असे सांगत, खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. याबाबत नीलेश पवार याने सांगली शहर पाेलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋतुराज शिरतोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.