आष्टा : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे अजय गणेश लोंढे (वय २०) याचा सोमवार, २१ रोजी गावातीलच अल्पवयीन मुलीशी बालविवाह झाला. याबाबतची माहिती मिळताच आष्टा पोलीस व ग्रामविकास अधिकारी दिलीप कदम यांनी मुलाच्या आई-वडिलांसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला.
गोटखिंडी येथील जयंत वसाहतीमधील टेलिफोन टॉवरनजीक अजय लोंढे याचे घर आहे. त्याचा गावातील १७ वर्षे ४ महिन्याच्या अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह सुरू असल्याची माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांना मिळाली.
कुंभार यांच्या आदेशानंतर ग्रामसेवक दिलीप कदम व लेखनिक सुभाष गुरव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी लग्न मंडप घालण्यात आला होता. दुपारी ३.३०च्या दरम्यान आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद, हवालदार अशोक जाधव, पोलीस पाटील प्रदीप धेंडे व बाल विकास प्रकल्प अधिकारी वैभव कांबळे घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी विवाह झालेला होता. गणेश लोंढे याचे वय २० वर्ष ६ महिने असून अल्पवयीन मुलीचे वय १७ वर्षे ५ महिने आहे. दोघेही अल्पवयीन असल्याने मुलाचे वडील गणेश लोंढे, आई सुनीता लोंढे यांच्यासह नातेवाईक कैलास गायकवाड, रुपाली गायकवाड, जयश्री सातपुते, नातेवाईक व अन्य १० ते १५ व्यक्तींसमोर हा विवाह झाला. त्यांच्यासह भटजी पवन आठवले यांच्या विरोधात आष्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित सिद व हवालदार अशोक जाधव करत आहेत.