सांगली : येथील वालचंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून सुरूअसलेल्या वादातून वकील कविराज पाटील यांनी महाविद्यालय प्रशासकीय मंडळाचे सदस्य रवी पुरोहित यांना ‘सांगली सोडून जा’, अशी धमकी दिली आहे. २८ मे रोजी हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पुरोहित यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिल्याने अॅड. पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.एमटीई व प्रशासकीय मंडळ यांच्यात गेल्या आठ दिवसांपासून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून वाद सुरू आहे. या वादातून दोन्ही गट आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. रवी पुरोहित चार दिवसांपूर्वी सांगलीत आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वालचंदचा हा वाद शासनाने मध्यस्थी करून संपवावा, अशी मागणी केली होती. पुरोहित विश्रामबागमधील एका हॉटेलमध्ये उतरले होते. अॅड. कविराज पाटील यांनी या हॉटेलमध्ये जाऊन पुरोहित यांना ‘प्रसारमाध्यमांना उलटसुलट बातम्या देतोस, तू सांगली सोडून जा’ अशी धमकी दिली. त्यामुळे पुरोहित यांनी विश्रमाबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाटील यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पुरोहित यांनी यापूर्वी एमटीई सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)माझ्या विरोधात खोटी तक्रार : पाटीलअॅड. कविराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पुरोहित यांनी विश्रामबाग पोलिसांत दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. पोलिसांना तपासात सहकार्य केले जाईल.
कविराज पाटलांविरुध्द गुन्हा
By admin | Published: May 31, 2016 11:39 PM