सांगली: वडर कॉलनीतील अश्विनकुमार मुळके याच्या खुनातील संशयित असलेल्या ‘ओन्ली आज्या’ टोळीतील सात जणांना विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ‘मोक्का’ लावण्यास मंजुरी दिली.
टोळीप्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय २३, बाल हनुमान गल्ली), टोळी सदस्य विकी प्रशांत पवार (वय २३), कुणाल प्रशांत पवार (वय २२, वडर कॉलनी, उत्तर शिवाजीनगर), गणेश रामाप्पा ऐवळे (वय ३६, गोकुळनगर), सुजित दादासाहेब चंदनशिवे (वय २९, फायर स्टेशनसमोर, उत्तर शिवाजीनगर), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय २८), अर्जुन हणमंत पवार (वय २२, रेल्वे स्टेशन रस्ता, वडर कॉलनी) या सात जणांच्या टोळीविरुद्ध खुनाबरोबर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे.
संशयित अजय ऊर्फ अजित खोत याने ‘ओन्ली आज्या’ नावाने टोळी बनवली होती. या टोळीने दि. १३ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरुद्वाराजवळ घरासमोर अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय ३०, नवीन वसाहत, सांगली) याचा खून केला होता. त्या दिवशी संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता. विकी याला अश्विनकुमारने हा रस्ता वाहतुकीसाठी नसल्याने दुसऱ्या मार्गाने जावा असे सांगितले. याचा राग मनात धरून विकी तेथून गेला. त्यानंतर दोन तासांनी मध्यरात्री १ च्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या सात जणांनी अश्विनकुमारला घराबाहेर बोलावून चाकू आणि इतर हत्यारांनी भोसकून खून केला. अश्विनकुमारचा आरडाओरडा ऐकून त्याचा मित्र गणेश महादेव हाताळे मदतीसाठी घटनास्थळी आला. तो देखील हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर संशयित हवेत हत्यारे नाचवत ‘नाद करायचा नाही’ असे म्हणत दहशत माजवत पसार झाले होते.
टोळीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सात जणांना अटक केली. टोळीविरुद्ध २०१४ पासून २०२४ पर्यंत गुन्हे दाखल आहेत. टोळीचे वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने दहशत निर्माण केली होती. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लावण्यासाठी विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी अधीक्षक संदीप घुगे यांना प्रस्ताव सादर केला. अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांना पाठवला. त्यांनी अवलोकन करून टोळीविरुद्ध मोक्का कलम लावून तपास करण्यास मंजुरी दिली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव तपास करत आहेत.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक ओमासे, उपनिरीक्षक सिद्धार्थ रुपनर, कर्मचारी अमोल ऐवळे, दीपक गट्टे, बसवराज शिरगुप्पी, पूजा जगदाळे आदींनी सहभाग घेतला.
टोळीची परिसरात दहशत-
‘ओन्ली आज्या’ टोळीतील कोणीही कामधंदा करत नाही. टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ‘मोक्का’ लावण्यास मंजुरी मिळाली आहे