सांगली : शहरातील भंगारविक्रेत्यांनी भंगार साहित्य घेतल्यानंतर ते कोणाकडून घेतले याबाबतची माहिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही याचे पालन न करणाऱ्या भंगार विक्रेत्यांवर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. यात सहाजणांवर गुन्हे दाखल केले आहेत.रफिक शेख, इसाक कमरुद्दीन बेलीफ, जैनुद्दीन हमीद शेख, राजू मल्हारी मोहिते, सुचंद पवार आणि दिलावर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्यांची नावे आहेत.
शहरासह जिल्ह्यात जुन्या वस्तूंच्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन चोरटे हा माल भंगार विक्रेत्यांना विकत असल्याचे आढळून आल्याने त्यांची चौकशी करून खरेदी रजिस्टर ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. तरीही शहरातील काही विक्रेते त्याबाबतची माहिती ठेवत नव्हते. यामुळे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी शहरातील भंगार विक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यात रजिस्टर अद्ययावत न ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यात रफिक शेख (कोल्हापूर रोड), इसाक कमरूद्दीन बेलीफ (जुना बुधगाव रोड), जैनुद्दीन हमीद शेख (विनायकनगर), आयुब दिलावर शेख (माधवनगर), सुचंद तुकाराम पवार (जुना कुपवाड रोड) यांच्याकडील काही मालाची ते माहिती देऊ शकले नाहीत म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चौकट
रजिस्टर ठेवा
शहरातील भंगार व स्क्रॅप विक्रेत्यांनी माल खरेदी करताना त्याची माहिती नोंदवून ठेवावी. माल खरेदी करताना काही शंका आल्यास पोलिसांशी संपर्क करावा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे.