कुपवाड : शहरातील रामकृष्णनगर येथील शोभा बाळू कसबे या महिलेला 'आर्थिक देवाण-घेवाणीतून जातिवाचक शिवीगाळ करून तिला व तिच्या पतीला धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लता गणपत पाटील (रा. रामकृष्णनगर, कुपवाड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
कुपवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शोभा कसबे यांनी संशयित लता पाटील यांच्याकडून पैसे घेतले होते. हे पैसे देण्याच्या कारणावरून संशयित पाटील यांनी कसबे या महिलेला शिवीगाळ केली.
कसबे यांनी माझ्याकडे पैसे आल्यावर मी तुला पैसे देते. तू मला शिवीगाळ करू नकोस, असे म्हटल्यावर पाटील यांनी कसबे या महिलेला तुमची औलाद पैसे बुडविणारीच आहे. तुला व तुझ्या नवऱ्याला जुिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार कुपवाड पोलिसात दाखल झाली आहे.
त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी संशयित पाटील या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर तपास करीत आहेत. संशयित पाटील या महिलेच्या विरोधात यापूर्वी कुपवाड पोलिसात खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.