सांगली : जातीवाचक शिवीगाळ करीत धमकी दिल्याप्रकरणी नांद्रे (ता. मिरज) येथील तलाठी महावीर पांडुरंग सासणे यांच्याविरुद्ध ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घडला होता. याप्रकरणी अरविंद महावीर कुरणे (वय ३४, रा. नांद्रे) याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अरविंद कुरणे हा सेंट्रिंगचे काम करतो. ११ जानेवारी रोजी कुरणे हा पंजाब माने व कपिल माने यांच्यासह तलाठी कार्यालयात गेला होता. पंजाब माने यांच्या गहाण खत वारस नोंदीबाबत त्याने तलाठी महावीर सासणे यांच्याकडे विचारणा केली. यावेळी सासणे यांनी, तुझा काय संबंध, तू कोण विचारणार, असे म्हणत अंगावर धावून गेले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करीत तुला गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. तसेच कार्यालयातून हाकलून दिल्याची तक्रार कुरणे यांनी पोलिसांत दिली आहे.