इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील एकाला खासगी सावकाराने व्याजाने दिलेल्या ५० हजार रुपयांच्या मुद्दलापोटी एक लाख १७ हजार रुपये देऊनही दुचाकी काढून घेण्याची धमकी देत आणखी पैशाची मागणी करणाऱ्या शिरटे (ता. वाळवा) येथील दोघा सावकारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
याबाबत शरद जयवंतराव खोत (वय ४२, सध्या रा. पुणे, मूळ रा. कि.म.गड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हुसेन इस्माईल शेख आणि मेहबूब इस्माईल शेख (दोघे रा. शिरटे) या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोत यांनी मार्च २०१५ मध्ये हुसेनकडून महिन्याच्या बोलीवर १० टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. या पैशाची परतफेड न झाल्याने सावकारी व्याजाचा हा दर हुसेन शेख याने २० टक्के लावला. त्यानंतर पैशाच्या मोबदल्यात हुसेनने खोत यांची दुचाकी (क्र. एमएच १२ डीक्यू ३४२१) ओढून नेली होती. ऑगस्ट १५मध्ये खोत यांनी ५० हजारांची रक्कम हुसेनला दिली होती. त्यावेळी शेख याने राहिलेले ५० हजार रुपये पाहिजेत म्हणून दमदाटी केली. त्यावर २० टक्के व्याज लावण्याची धमकी देत होता. हुसेनच्या त्रासाला कंटाळून नोव्हेंबर १५मध्ये खोत यांनी आणखी ५० हजार रुपये आईच्या हाताने शेख याला दिले व आता यापुढे पैसे देणे-घेणे नाही, असे त्याला सांगण्यात आले.
त्यानंतर हुसेनचा भाऊ मेहबूब हा शरद खोत यांना आणखी २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत पुन्हा धमकावत होता. खोत यांनी डिसेंबर १५ मध्ये घरी असणारे १७ हजार १०० रुपये हुसेन शेखला दिले होते. त्यानंतरही दोघा भावांचा आणखी पैशासाठी तगादा सुरूच राहिल्याने खोत यांनी पोलिसात धाव घेतली.