सांगली : येथील शालिनीनगरमधील महिलेस दुखापत करून तिच्या ताब्यातील वाहने बेकायदेशीरपणे ओढून नेल्याप्रकरणी मिरजेचे तत्कालीन तहसीलदार रणजित पांडुरंग देसाई व मंडल अधिकारी विजय संपत तोडकर यांच्यावर न्यायालयात मारहाणीसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्वाती नाईकनवरे-गरड यांनी शुक्रवारी याबाबतचा निकाल दिला.
शालिनीनगर येथील लक्ष्मण हिप्परकर यांचा बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे. १३ मार्च २०२० रोजी हिप्परकर नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नी मनीषा घरी होत्या. पहाटे चारच्या सुमारास तत्कालीन तहसीलदार व सध्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले रणजित देसाई, मंडल अधिकारी विजय तोडकर यांच्यासह चारजण हिप्परकर यांच्या घराजवळ आले. यातील काहींनी गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनीषा हिप्परकर यांनी, ‘आपण घरात एकटीच असून, पती आल्यानंतर या’, असे सांगितले. यावेळी महसूल पथकातील अधिकारी पोलिसांना बोलावून कुलूप काढण्याची धमकी देत शिवीगाळ करू लागले. त्यामुळे अखेर त्यांनी गेटचे कुलूप काढले. त्यानंतर मनीषा यांना हाताला ओढून आणत बाहेर आणले व तेथील दोन वाहनांच्या चावीची मागणी करण्यात आली. त्यांच्याकडून चाव्या घेत दोन्ही वाहने नेण्यात आली.
लक्ष्मण हिप्परकर परगावहून परतल्यानंतर मनीषा यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ॲड. भालचंद्र केशव परांजपे यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागण्यात आली होती. हिप्परकर यांच्या घरी सीसीटीव्ही यंत्रणा असल्याने या सगळ्या प्रकाराचे चित्रीकरण झाले होते.
चौकट
दोघांवर ठपका, इतरांना वगळले
ॲड. परांजपे यांनी रणजित देसाई, विजय तोडकर, आण्णासाहेब हंगे, दत्तात्रय मोठे, पुंडलिक रूपनर, कबीर सूर्यवंशी, श्रीकांत तारळेकर, सुभाष जाधव, प्रकाश पांढरे, कीर्तीकुमार धस, संजय खरात, प्रवीणकुमार जाधव यांच्याविरोधात फिर्याद दिली. न्यायालयाने तहसीलदार देसाई व तोडकर यांच्यावर ठपका ठेवत अन्य संशयितांना खटल्यातून वगळण्यात आले.