सांगली : कॅसिनो जुगारावर पैसे लावून यासाठी पोलिसांना हप्ते द्यावे लागतात, असा उल्लेख करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एलसीबीचे हवालदार अरुण औताडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगणकावर ऑनलाईन पद्धतीने चालणार्या कॅसिनो जुगाराचे दोघांनी व्हिडीओ शूटिंग केले आहे. यात एक संशयित एक हजार रुपये त्या जुगारावर लावून खेळताना दिसत आहे, तर हा जुगार कसा खेळायचा याचीही माहिती तो देत आहे. याशिवाय या जुगारावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. कारण त्यांना प्रत्येक दुकानदाराकडून १८ हजार रुपये हप्ता दिला जात आहे, असा उल्लेखही त्या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
दोघा संशयितांनी केवळ व्हिडीओ करून न थांबता, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओतून पोलीस दलाची बदनामी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आयटी ॲक्टनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.