सांगली : तासगाव बचत भवनातील गाळ्यांसंदर्भात प्रशासनाची कारवाई योग्यच आहे. आंदोलकांनी तेथील महिला अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बेकायदेशीर कृत्य सुरू केल्याचा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.
तासगाव बचत भवनातील गाळ्यांच्या वापरावरून प्रशासन आणि गाळेधारकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. प्रशासनाने काही गाळे सील केले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. डुडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, २८ गाळे भाडेकराराने दिले आहेत. त्यातील काहींनी भाडेकरार केलेले नाहीत. काहींनी बेकायदेशीररीत्या पोटभाडेकरू ठेवले आहेत, तर काहींनी नियमबाह्य फेरफार केले आहेत. तशा तक्रारी प्रशासनाकडे आल्याने ६ जुलै रोजी गाळ्यांची तपासणी केली. अमोल पाटील यांना गाळा मंजूर होऊनही करारनाम्यास टाळाटाळ केल्याचे आढळले. विनापरवाना पोटभाडेकरू ठेवून चहाचे हॉटेल सुरू केले. पोटमाळ्यांची भिंत पाडून दोन पोटमाळे एकत्र करून वापर सुरू केल्याचे दिसले. गाळ्याचे १ लाख ४४ हजार रुपये भाडे थकवून जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान केले आहे.
डुडी यांनी सांगितले की, रवींद्र नलवडे या गाळेधारकानेही बेकायदेशीर फेरफार करून दोन पोटमाळे एकत्र जोडले आहेत. विठ्ठल कदम यांनी जुलैअखेर ७५ हजार रुपये भाडे थकीत ठेवले असून, सव्वादोन लाख रुपयांची अनामतही भरलेली नाही. या सर्वांना वारंवार नोटिसा काढण्यात आल्या होत्या, त्यानंतरच गाळे सील करण्यात आले; पण त्यांनी बेकायदा जमाव जमवून व आमरण उपोषणाचा धाक दाखवून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
चाैकट
महिला अधिकाऱ्यांवर दबावतंत्र
डुडी म्हणाले की, तासगाव पंचायत समितीत सभापती, गटविकास अधिकारी व उपअभियंता पदावर महिला काम करीत आहेत. आंदोलकांकडून त्यांच्यावर अरेरावी व दमदाटी करून, दबाव टाकून बेकायदेशीर कामे करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महिला सक्षमपणे काम करीत आहेत. आंदोलकांकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून व आर्थिक हानी पोहोचवून प्रशासनाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारीची प्रक्रिया सुरू केली आहे.