सांगली: मिरजेतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इशरत ऊर्फ इशरतअली इरफान बारगीर (वय २५, रा. सांगली वेस, नदाफ गल्ली) याला झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत आदेश दिला आहे.
अधिक माहिती अशी, इशरत बारगीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनापरवाना पिस्तुल वापरणे, बेकायदा जमाव जमवून महिलेचा विनयभंग करणे, गंभीर दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
इशरत याला स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव मिरज शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे पाठवला होता. घुगे यांनी स्थानबद्धतेच्या शिफारसीने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवला. या प्रस्तावाची सविस्तर चौकशी करून जिल्हाधिकारी दयानिधी यांनी इशरत बारगीर याला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (एमपीडीए) नुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. दि. १४ जुलै रोजी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, मिरजेचे निरीक्षक अरूण सुगावकर, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, कर्मचारी अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, संदीप मोरे, निशिकांत कोरे, शक्तीकुमार पोकळेकर, अमीर फकीर, झाकीरहुसेन काझी, सचिन फडतरे, सपना निकम यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.