सांगली : दहा लाखांपेक्षा जास्त रकमेच्या थकित कर्जापोटी सांगलीतील २३ कर्जदारांवर फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साईनाथ पतसंस्थेच्या संचालकांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्याशी चर्चा करून फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गायकवाड यांनी दिले आहे.साईनाथ महिला नागरी पतसंस्थेवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक नियुक्त होता. आता नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळाने थकबाकीदार कर्जदारांकडून वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. यावेळी कायद्यातील तरतुदीनुसार दहा लाखावरील कर्जदारांवर फौजदारी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उपनिबंधकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. दहा लाखांवरील कर्जदारांवर कारवाई करताना अन्य कर्जदारांची नावे फलकांद्वारे संबंधित भागात झळकविण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी दिली. साईनाथ पतसंस्थेची एकूण थकबाकी आता १२ कोटी ७५ लाख इतकी असून, १ हजार २२१ एकूण थकबाकीदार आहेत. ७ कोटींचे तारणी, तर बिगरतारणी कर्ज ५ कोटी रुपयांचे आहे. (प्रतिनिधी)हाबळे यांच्याविरुद्ध तक्रारपतसंस्थेच्या अध्यक्षा विभावरी कुलकर्णी, संचालक धनंजय कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी, महादेव पाटील यांनी निवेदनाद्वारे कर्जदार व माजी नगरसेवक विजय हाबळे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ज्यांनी पतसंस्था बुडविण्यास हातभार लावला, त्यांनी ठेवीदारांच्या बाजूने निवेदन कसे दिले?, असा सवाल उपस्थित केला आहे.
पतसंस्थेच्या २३ कर्जदारांवर फौजदारीच्या हालचाली
By admin | Published: March 01, 2016 11:24 PM